Thursday 14 November 2019

मैं फिक्र को धुये मी उडाता चला गया

जवळपास रात्रीचे ८ वाजले असतील, मी आणि अक्षय कांही खरेदी करण्यासाठी सिताबर्डी वर गेलो होतो. रिजंट टॉकीजचे जवळ एक पानठेला आहे. मी कधी पानठेल्यावर जाऊन पान किंवा तत्सम मुखशुद्धी करणारे पदार्थ खायला फारसा जात नाही. पण या वयाचे ७७ वर्ष पूर्ण झालेल्या पानठेले वाल्याकडे माझे लक्ष नकळत गेले. मी उत्सुकतेने त्या ठेल्याकडे गेलो. त्याचा हसतमुख चेहरा बघून खूप छान वाटले. थोडावेळ गप्पाटप्पा झाल्या. बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितले की जवळपास ५० वर्षांपासून याच पानठेल्यावर ते काम करत आहेत. पानठेला त्यांचा स्वत:चा आहे. मध्येच त्यांनी एका गाण्याची तान छेडली " मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुंए में उड़ाता चला गया" . मी विचार करु लागलो की त्यांच्या गाण्यात किती सत्यता होती. आणि म्हणूनच ते अविरत ५० वर्षांपासून आनंदाने आपले काम करत आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने मनमोकळेपणाने संवाद साधला पाहिजे, आनंदी रहायला पाहिजे. या थोड्या वेळाच्या भेटीमध्ये तो पानठेलेवाला मला जिवन जगण्याचं तत्वज्ञान शिकवून गेला.